राजस्तानातून १०९ पाकिस्तानी नागरिक हद्दपार   

जयपूर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, १०९ पाकिस्तानी नागरिकांना राजस्तानमधून हद्दपार करण्यात आले आहे, तर ८४१ पाकिस्तानी नागरिकांनी दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला आहे. अधिकार्‍यांनी मंगळवारी ही माहिती दिली.पोलिस मुख्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले, की मुख्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्तानमध्ये विविध व्हिसांवर आलेल्या ८४१ पाकिस्तानी नागरिकांनी दीर्घकालीन व्हिसासाठी (एलटीव्ही) अर्ज केला आहे. अलीकडच्या काळात आलेल्या व्हिसावर १०९ पाकिस्तानी नागरिकांना नुकतेच राजस्तानमधून पाकिस्तानात परत पाठवण्यात आले आहे.
 
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी गेल्या आठवड्यात पोलिस आणि प्रशासकीय अधिकार्‍यांना दिले होते. 
 
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद कुमार यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत एलटीव्ही व्यतिरिक्त इतर व्हिसावर राज्यात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या हद्दपारीची कारवाई केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांमध्ये नमूद केलेल्या कालमर्यादेनुसार करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित पोलीस अधीक्षकांना आणि संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. 

Related Articles